Friday, August 19, 2016


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ‘जुवेचा राजा
सांतइस्तेव्ह जुवे येथे मूर्तीकार, चित्रकार तुकाराम चोडणकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा कुळागरातला ‘जुवेचा राजा’ साकारतो आहे. चोडणकर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सध्या देखावा निर्मितीच्या कामात व्यस्त आहेत. सांतइस्तेव्ह गावात दोन वर्षे दीड तर तिसऱ्या वर्षी पाच दिवस चतुर्थी सण असतो. याला ‘तिसाल’ असे म्हणतात. त्यामुळे गणपतीला पाच दिवस घरी ठेवण्याचा आनंद हा दर दोन वर्षांनी गावकऱ्यांना अनुभवायला मिळायचा. परंतु जेव्हापासून ‘जुवेचा राजा’ साकारू लागला आहे, तेव्हापासून इथल्या लोकांच्या आनंदाला उधाण आले आहे. संकल्पना चोडणकरांची
मूर्तीकार तुकाराम(दादा) चोडणकर

२००८ साली कला युवक संघाच्या पुढाकाराने ‘जुवेचा राजा’चा देखावा करण्यास सुरूवात झाली. चोडणकर आखाती देशात कामाला होते. चतुर्थीच्या निमित्ताने गोव्यात यायचे. गावच्या आसपासच्या कुंभारजुवे, माशेल परिसरात गणपती देखावे केले जातात, तसे आपणही करूया अशी चर्चा चोडणकर आणि त्यांच्या मित्रांमध्ये झाली. जुवेंतील समाजकार्यकर्ते रामानंद चोडणकर यांनी या संकल्पनेला समर्थन दिले आणि कला युवक संघाच्या माध्यमातून हा संकल्प तडीस नेण्याचे ठरले. कुठलेही सोंग घेण्यास सोपे, परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही. हे जरी खरे असले तरी, यावेळी तुकाराम चोडणकर यांनी सहकार्य करण्याचे ठरविले. ते नुकतेच आखातातून आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे थोडे पैसे होते. त्यांनी स्वखुशीने आपण हा संकल्प तडीस नेऊयाच म्हणून तयारी सुरू केली. जागेचा प्रश्न होता. तेव्हा गुरुदास शेट यांनी तेव्हा जागा दिली. त्या वर्षीचा प्रश्न सुटला परंतु आजही त्यांना जागेचा प्रश्न सतावत असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत तीन ठिकाणी देखाव्याची जागा बदलण्यात आली. परंतु सर्वांच्या जिद्दीमुळे हा प्रश्न तात्पुरता का असेना सुटतो, असे त्यांनी सांगितले. २००८ पासून सुरू केलेल्या या देखाव्याला राज्यभरातून प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना सलग तीन वर्षे कला व संस्कृती संचालनालयाचे तसेच इतर संस्थांची प्रथम पारितोषिके प्राप्त झाली आहेत. यंदा कुळागराचा देखावा
कऱ्ह्यातील गणपती, अष्टविनायक दर्शन, कृषी संस्कृतीचा देखावा इत्यादी विविध संकल्पनेवर दरवर्षी ‘जुवेचा राजा’ साकारला जातो. याविषयी बोलताना चोडकर म्हणाले, आपल्या मनात वर्षभर एखादी संकल्पना रेंगाळत राहिली की स्वस्थ बसवत नाही. त्यानंतर लगेचच आम्ही कामाला सुरूवात करतो. यंदा कुळागरातला देखावा करायचा ठरला तेव्हा मे महिन्यातच आम्ही लगबग सुरू केली. देखाव्याच्या आवारात चतुर्थीपर्यंत झाडे वाढली पाहिजेत त्यासाठी आधी झाडे लावण्यात आली. मांडवी नदीच्या मधोमध असलेल्या जुवे गावातील ‘चवडार’ या ठिकाणी १२००० स्क्वेअर मीटर जागेत हा प्रशस्त देखावा उभारण्यात आला आहे. अगदी नदीच्या काठावर संपूर्ण स्थळ माडाच्या आणि सुपारीच्या झावळ्यांनी आच्छादलेले असल्यामुळे या ठिकाणाला कुळागराचं स्वरूप लाभले आहे. देखाव्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, हा देखावा कुळागरात मिळणाऱ्या वस्तूंनी साकारण्यात आला आहे. जवळ जवळ शंभराहून अधिक माड्या (सुपारीची झाडे), सुपाऱ्या, झावळ्या, पोवल्या, बांबू इत्यादी साहित्य यासाठी वापरण्यात आले आहे.
जुवेचा राजा’ आणि संगीत

प्रवेशद्वारावरच शुभ्र पाण्याचा सतत वाहणारा धबधबा, या धबधब्याच्या वाहणाऱ्या पाण्यात पाय धुऊन पुढे गेल्यावर शिवलिंग दर्शन व अभिषेक करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यानंतर विविध देवतांच्या मूर्तींचे दर्शन घेतल्यावर भव्य दालनात मुख्य गणपतीची मूर्ती आहे. आपल्या सवंगड्यांच्या भजन मैफलीत गणपती तबला वाजवत आहे, अशा आविष्कारात यंदाची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे. समोर अनेक मुषक आणि गण भजन गात आहेत, अशा स्वरूपात इथला दरबार मांडण्यात आला आहे. एक मुषक हार्मोनियम वाजवत असून इतर मुषक टाळ वाजवत भजनात दंग झाले आहेत, असे चित्र आहे.
यंदाचा देखावा गणेश भक्तांना जरूर आवडणार, अशी आशा श्री. चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. कला युवक संघाचे विद्यमान अध्यक्ष श्रीराम परब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे सदस्य देखाव्याच्या कामात गुंतले आहेत