Wednesday, April 1, 2026

 

"हंसा-२०२५" दिवाळी अंकाला "आवाजकार मधुकर पाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट पुरस्कार"

गोमंतकीय ज्येष्ठ पत्रकार प्रिया कालिका बापट संपादित दिवाळी अंक

 


मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई यांच्या प्रतिष्ठित ५० व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत गोमंतकीय ज्येष्ठ पत्रकार प्रिया कालिका बापट संपादित आणि मनसा क्रिएशन्स प्रकाशित "हंसा-२०२५" दिवाळी अंकाला "आवाजकार मधुकर पाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट पुरस्कार" प्राप्त झाला आहे. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून बापट यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उद्योजक अशोक पाटील, ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते, चंद्रकांतच्या संपादिका श्रीमती निलिमा कुलकर्णी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त विकास होशिंग, माजी नगरसेवक ऍड मनमोहन चोणकर, ऍड देवदत्त लाड, संजीव गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि दर्जेदार दिवाळी अंक परंपरेच्या जतनासाठी गेली पाच दशके ही राज्यस्तरीय स्पर्धा संघाच्या वतीने सातत्याने आयोजित केली जाते. राज्यभरातून प्रकाशित होणाऱ्या विविध दिवाळी अंकांमधून यंदा ५० व्या स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट आशय संपादकीय दृष्टी, मांडणी आणि साहित्यिक गुणवत्ता या निकषांवर दिवाळी अंकाची निवड करण्यात आली असल्याचे रवींद्र मालुसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

यंदा मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून, मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत दादर सार्वजनिक वाचनालय आणि काशिनाथ धुरू सभागृह यांच्या सहकार्याने संघाने दिवाळी अंकांचे पुरस्कार प्रदान केले. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना उपमहापौर संजय घाडी म्हणाले, मराठीची खरी ताकद तिच्या बोलीभाषेत आहे. मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती आपली मराठी माऊली आहे. शिवरायांच्या तलवारीच्या तेजासोबतच मराठी भाषेने स्वराज्याचा स्वाभिमान जपला. आज जगातील पहिल्या १५ प्रमुख भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शतकापासूनची दिवाळी अंक परंपरा यापुढेही जोपासायची असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांनी दिवाळी अंक विकत घेऊन वाचले पाहिजेत, अंक वाचणे म्हणजेच मराठी संस्कृती टिकवणे होय. असेही ते पुढे म्हणाले. 

यावेळी संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंकांचा तसेच स्पर्धेतील इतर दिवाळी अंकांच्या संपादकांचा गौरव करण्यात आला. मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक - नवलाई ( कार्यकारी संपादक- प्रभू कापसे डोंबिवली ) यांना प्रदान करण्यात आला. साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक - लाडोबा (घनश्याम पाटील, पुणे) यांना प्रदान करण्यात आला. आश्रय -विनय गावकर, (गोवा कवी बा.भ.बोरकर पुरस्कार), मौज - मोनिका गजेंद्रगडकर, मुंबई  ( कथाकार अनंत काणेकर स्मृती पुरस्कार ),ऋतुरंग - अरुण शेवते, मुंबई  ( कवी वसंत बापट स्मृती पुरस्कार ), वसंत - दिलीप देशपांडे, मुंबई   (कवयित्री शांता शेळके स्मृती पुरस्कार ),हंस - अभिराम अंतरकर, पुणे  ( साहित्यिक जी.ए. कुलकर्णी स्मृती पुरस्कार ), चंद्रकांत आणि धनंजय  - श्रीमती नीलिमा कुलकर्णी,मुंबई  ( गझलकार सुरेश भट स्मृती पुरस्कार ),आवाज - भारतभूषण पाटकर, मुंबई  ( साहित्यिक प्र.के. अत्रे स्मृती पुरस्कार ), कालनिर्णय - जयराज साळगावकर, मुंबई ( साहित्यिक रणजित देसाई स्मृती पुरस्कार ),धनुर्धारी - नंदकुमार सापळे ( जयंत नारळीकर स्मृती पुरस्कार ),नवाकाळ - रोहित पांडे, मुंबई ( साहित्यिक शिवाजी सावंत स्मृती पुरस्कार ), दीपावली - अशोक कोठावळे, मुंबई  (साहित्यिक जयवंत दळवी स्मृती पुरस्कार ), मेनका,माहेर, जत्रा   - सुमित टेकाळे, पुणे   (कविवर्य ग.दि. माडगूळकर स्मृती पुरस्कार ) आदींना  सुवर्णमुद्रा दिवाळी अंक पुरस्कार प्रदान करण्यात आला. "हंसा- २०२५" दिवाळी अंकाचा सन्मान म्हणजे सर्व सह भागी लेखक, कवी-कवयित्रींचा सन्मान, मनसा क्रिएशन्सचा सन्मान. अश्या शब्दात प्रिया कालिका बापट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईचे महापौर संजय घाडी यांच्या हस्ते मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा "आवाजकार मधुकर पाटकर स्मृती सर्वोत्कृष्ट पुरस्कार" स्वीकारताना संपादक प्रिया कालिका राजेंद्र बापट. सोबत उद्योजक अशोक पाटील, ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते, चंद्रकांतच्या संपादिका श्रीमती निलिमा कुलकर्णी, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, दादर सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष मनोहर साळवी व इतर.

 

 

 

कालिका बापट यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा "दामिनी राष्ट्रीय पुरस्कार"

 

 

नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणारा पत्रकारितेसाठीचा "दामिनी राष्ट्रीय पुरस्कार" गोव्याच्या नामवंत पत्रकार प्रिया कालिका बापट यांना प्रदान करण्यात आला. रोटरी क्‍लब सभागृह, शालिमार नाशिक येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

यावेळी विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांना  या प्रतिष्ठेच्या दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  नाशिकचे उपमहापौर मा.श्री. विलास शिंदे, नगरसेवक तथा शिवसेना उपनेते, मा.श्री. अजय बोरस्ते,  किमस् मानवता हॉस्पिटलचे सर्जन मा.श्री. डॉ. अमित केले, शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा.सौ. जयश्रीताई थोरात,  ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.डॉ.आशाताई पाटील, एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.सौ. संध्या मिलिंद खेडकर, नाशिकच्या लोकप्रिय साहित्यीक व समुपदेशक मा. प्रा.डॉ. सौ. शोभा सातभाई, मिसेस इंडिया दुबई विजेत्या मा.अश्‍विनी अत्रे,  भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी, भाजपचे शहराध्यक्ष मा.श्री.सुनील केदार, चित्रपट निर्माते नाना बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला नाशिकच्या ज्येष्ठ नृत्यांगना सुरेखा मैंद यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर  सावित्रीबाई फुले व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी प्रास्ताविक करून महिला दिनाचे औचित्य विशद केले. त्याचप्रमाणे उपमहापौर विलास शिंदे, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, डॉ.अमित केले, डॉ. आशाताई पाटील, प्राचार्या सौ. संध्या खेडकर, लक्ष्मण सावजी, प्रा.शोभा सातभाई आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले.  यानंतर महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातून आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने तुतारीच्या निनादात शाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.


दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा पत्रकारितेसाठीचा "दामिनी राष्ट्रीय पुरस्कार" प्रिया कालिका बापट यांना प्रदान करताना डॉ.अमित केले. सोबत डॉ. महेंद्र देशपांडे , लक्ष्मण सावजी व इतर मान्यवर.

 

मनसा क्रिएशन्सच्या "हंसा-२०२५"दिवाळी अंकाला  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर सर्वोत्कृष्ट पुरस्कार

 

 

नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा दिवाळी अंक २०२५ स्पर्धेचा "सर्वोत्कृष्ट पुरस्कार" गोव्यातील मनसा क्रिएशन्सच्या "हंसा" दिवाळी अंकाला प्राप्त झाला आहे. ज्येष्ठ नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांच्या हस्ते संपादक प्रिया कालिका बापट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा अंक यावेळी दिवाळी अंकांच्या परंपरेला वाहिलेला आहे. यात मोहिनी, नवल, हंसचे संपादक अभिराम अंतरकर, गंधालीचे संपादक मधुकर वर्तक, आवाज दिवाळी अंकाचे संपादक भारतभूषण पाटकर, ऋतुरंगचे संपादक अरुण शेवते आदींचे माहितीपूर्ण लेख आहेत. शिवाय गोवा आणि महाराष्ट्रातील लेखक, कवींचे यात लेख आणि कविता आहेत. "हंसा" दिवाळी अंकाला यंदाचा मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा यंदाचा उत्कृष्ट प्रथम पुरस्कार कुळवाडी दिवाळी अंकाला. द्वितीय शब्दवेल तर तृतीय पुरस्कार सहस्रबाहु दिवाळी अंकाला मिळाला आहे. विशेष विषयाला वाहिलेला प्रथम पुरस्कार वेदांतश्री दिवाळी अंकाला तर द्वितीय अर्थशक्ती दिवाळी अंकाला मिळाला आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून  नाशिकचे उपमहापौर मा.श्री. विलास शिंदे, नगरसेवक तथा शिवसेना उपनेते, मा.श्री. अजय बोरस्ते,  किमस् मानवता हॉस्पिटलचे सर्जन मा.श्री. डॉ. अमित केले, शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा.सौ. जयश्रीताई थोरात,  ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.डॉ.आशाताई पाटील, एसएमआरके महाविद्यालयाच्या प्राचार्या मा.सौ. संध्या मिलिंद खेडकर, नाशिकच्या लोकप्रिय साहित्यीक व समुपदेशक मा. प्रा.डॉ. सौ. शोभा सातभाई, मिसेस इंडिया दुबई विजेत्या मा.अश्‍विनी अत्रे,  भाजपचे शहराध्यक्ष मा.श्री.सुनील केदार, चित्रपट निर्माते नाना बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.


मनसा क्रिएशन्सच्या "हंसा" दिवाळी अंकाच्या संपादक प्रिया कालिका बापट
  यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार प्रदान करताना ज्येष्ठ नेते व प्रवक्ते लक्ष्मण सावजी. सोबत डॉ.अमित केले,डॉ. महेंद्र देशपांडे व इतर मान्यवर.