Sunday, December 10, 2017

तबला, पखवाज जुगलबन्दीचा आविष्कार




उस्ताद अक्रम खान (तबला) आणि पंडित रवीशंकर उपाध्याय (पखवाज) यांच्या जुगलबन्दीच्या आविष्काराने सातव्या स्वरमंगेश महोत्सवाला रंग भरला. ताल, लय, ठेका याचा अनोखा मिलाफ आणि कलाकारांची एकमेकांना मिळत असलेली साथ याने जुगलबन्दी अधिकच रंगत गेली. एकूणच या कार्यक्रमाने सभागृहातला माहोल तालमय झाला होता.
उपस्थित श्रोत्यांनी उत्सफूर्त दाद देत कलाकारांचे कौतुक केले. रविवारी सकाळी उद्योजक राजेश तारकर यांच्या हस्ते स्वरमंगेश महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्योजिका दीपा तारकर, सदानंद देसाई, दिलीप सहकारी, स्वस्तिक संस्थेचे विनयकुमार मंत्रवादी, सचिव मुरूगेश रमण आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी बोलताना राजेश तारकर म्हणाले, शास्त्रीय संगीत हे अध्यात्माची सांगड घालणारे माध्यम आहे. संगीत देवत्वाकडे नेते त्यामुळेच ते मनापर्यंत थेट पोचते. संगीताची जादू ज्यांना उमगली ते भाग्यवान आहे, असेही ते पुढे म्हणाले. यावेळी त्यांनी डॉ.प्रवीण गावकर यांच्या कार्याची दखल घेत असे महोत्सव आयोजित करणे महान कार्य असल्याचे सांगून डॉ.गावकर यांचे कौतुक केले. अशा कार्यक्रमांसाठी आपला सदैव पुढाकार असून, यापुढेही या स्वरमंगेश महोत्सवासाठी आपण सदैव सहकार्य करणार असे त्यांनी आश्वासन दिले.
विनयकुमार मंत्रवादी यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ दिले. डॉ.प्रवीण गावकर यांनी स्वागत केले. प्रा.गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले व त्यांनीच आभार मानले. त्यानंतर मीता पंडित यांची शास्त्रीय गायनाची मैफल झाली. त्यांना दयानिधेश कोसंबे, सिंधू हेगडे आदींनी संगीतसाथ दिली. दुपार नंतरच्या सत्रात रूद्रशंकर मिश्रा यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पंडित प्रवीण गोडखिंडी यांचे बासरीवादन झाले. उस्ताद रशीद खान यांच्या मैफलीने स्वरमंगेश महोत्सवाची सांगता झाली.

उस्ताद अक्रम खान (तबला) आणि पंडित रवीशंकर उपाध्याय (पखवाज) यांची जुगलबन्दी

स्वरमंगेश महोत्सवात दीपप्रज्ज्वलन करताना राजेश तारकर. सोबत डाविकडून दीपा तारकर, विनयकुमार मंत्रवादी, सदानंद देसाई.


No comments: