Saturday, December 9, 2017


मंगेशकरांच्या गायकीत शास्त्रीय संगीताची बैठक
"स्वरमंगेश" महोत्सवात पंडित सत्यशील देशपांडे यांचे मत

मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या नाट्यगीतांमध्ये शास्त्रीय संगीताची बैठक आहे. त्यामुळे समकालीन गायक कलाकारांपेक्षा त्यांची गायकी सर्वांहून वेगळी होती, असे मत गायक, संगीत समीक्षक पंडित सत्यशील देशपांडे यांनी कला अकादमीत व्यक्त केले.
पणजीतील स्वस्तिक या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल कार्य करणार्‍या संस्थेतर्फे आयोजित सातव्या स्वरमंगेश महोत्सवातील पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पंडित देशपांडे यांचे "मास्टर दिनानाथ मंगेशकरांची गायकी" या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या विषयावर भाष्य करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी दिनानाथ मंगेशकरांच्या ध्वनीफितीतील काही नाट्यगीते रसिकांना ऐकवली. व त्यातूनच उदाहरणे देत त्यांच्या गायकीविषयी विश्लेषण केले. ते पुढे म्हणाले, मास्टर केशवराव भोसले आणि बालगंधर्वांची प्रेरणा घेऊन दिनानाथांनी नाट्यसृष्टीत पदार्पण केले. परंतु त्या दोघांच्या गायकीची छाप दिनानाथांच्या गायकीत आढळत नाही. दिनानाथ मंगेशकरांनी आपल्याकडील प्रतिभेच्या जोरावर गायकीत वेगळी वाट चोखाळली. त्यांची गायकी इतरांहून वेगळी होती. त्याकाळी अनेकांनी त्यांच्या गायकीवर टीका केली. परंतु दीनानाथांनी आपल्या प्रतिभेला अधिकच धारदार बनविले. ऐन चाळीशीत दीनानाथ मंगंशकर गेले. ते अधिक जगले असते तर नाट्यसंगीताला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले असते. शास्त्रीय संगीतांमध्ये त्यांनी अधिक कार्य केले असते, असे पुढे पंडित देशपांडे म्हणाले. दिनानाथ मंगेशकर असा एकमेव गायक कलाकार होता, ज्यांची त्याकाळी ध्वनीफित निघाली होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिनानाथांनी गाण्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. ते म्हणायचे "माझे गाणे सुरांचे आहे, आपण जे गातो ते माझे गाणे नाही", असे पंडित देशपांडे यांनी यावेळी सांगितले. या व्याख्याना दरम्यान विविध उदाहरणे देत त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीविषयी आपले विचार मांडले.
व्याख्यानाआधी डॉ.प्रवीण गावकर यांची शास्त्रीय गायन मैफल झाली. त्यांना सारंगीवर पंडित संगीत मिश्रा, तबल्यावर दयानिधेश कोसंबे, संवादिनीवर दत्तराज म्हाळशी, तर तानपुर्‍यावर सिंधू हेगडे यांनी संगीतसाथ केली. स्वरमंगेश महोत्सवातील पहिले सत्र स्वराली पणशीकर यांच्या मैफलीने सुरू झाले. त्यानंतर योगराज नाईक यांचे सतार वादन झाले. हेतल गंगानी आणि प्रा.गोविंद भगत यांनी बहारदार निवेदन केले.


गायन सादर करताना डॉ.प्रवीण गावकर. संगीतसाथ करताना दयानिधेश कोसंबे, सिंधू हेगडे

पंडित सत्यशील देशपांडे




No comments: